मुंबई | जुनी प्रभादेवी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ
आयोजित आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शाखा क्र.१९३
पुरस्कृत “स्व. अनंतशेठ नागवेकर चषक कुमार गट”
जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत आजच्या सामन्यांतून
विजय क्लब, अमर क्रीडा मंडळ, एस.एस.जी. फाउंडेशन आणि शिवमुद्रा प्रतिष्ठान
यांनी दमदार कामगिरी करत उपांत्यपूर्व फेरी गाठली.
विजय क्लबची सहज विजयगाथा
पहिल्या सामन्यात दादरच्या विजय क्लबने जय भारत मंडळाचा सहज पाडाव
करत आपली आगेकूच सुनिश्चित केली. मनीष वसकर व आयुष करपे यांच्या तुफानी चढाया, तसेच रोहन तिवारीच्या भक्कम पकडीमुळे जय भारतला सामन्यात फारसा
वावच मिळाला नाही. जय भारतकडून निरंजन साळुंखे आणि साहिल डांगरे प्रयत्नशील होते, पण विजय क्लबच्या आक्रमक खेळापुढे ते अपुरे पडले.
अमर क्रीडा मंडळाचा थरारक विजय
दिवसातील सर्वात चुरशीचा सामना अमर मंडळ आणि जय दत्तगुरू यांच्यात झाला. ३८-३५ अशा निसटत्या फरकाने अमरने सामना जिंकला.
सामन्याची रंगत तब्बल शेवटच्या क्षणापर्यंत टिकून होती.
दीपक पवारच्या एका निर्णायक चढाईने मिळवलेले ३ गुण,
तसेच रमेश रायकर व निहाल पेडणेकर यांच्या पकडीच्या साथीतून अमरने शेवटी बाजी मारली.
दत्तगुरूच्या आदित्य घोडेराव व नयन मोहिते यांचा संघर्ष विशेष कौतुकास्पद ठरला.
एस.एस.जी.चा वर्चस्वपूर्ण विजय
तिसऱ्या सामन्यात एस.एस.जी. फाउंडेशनने वारसलेन संघाचा जोरदार पराभव करत उपांत्यपूर्व फेरी गाठली.
हर्ष शिगवण, अनुराग जुवाठकर आणि संस्कार गांगे यांच्या चढाई व पकडीच्या झंझावाती खेळाने विजय साकार झाला.
वारसलेनकडून निलेश परबने चमकदार खेळ केला, पण संघाला विजय मिळवून देण्यात असमर्थ ठरला.
शिवमुद्रा प्रतिष्ठानचा एकतर्फी विजय
दिवसाचा शेवटचा सामना शिवमुद्रा प्रतिष्ठान व दुर्गामाता स्पोर्ट्स
यांच्यात रंगला. विशाल लाड आणि अथर्व हाटकर यांच्या अष्टपैलू खेळामुळे शिवमुद्राने ३१-१४ अशा फरकाने सहज विजय मिळवला.
दुर्गामाताकडून तनिष चव्हाणचा खेळ उल्लेखनीय ठरला.
Post a Comment
0 Comments