Type Here to Get Search Results !

“स्व. अनंतशेठ नागवेकर चषक” जिल्हास्तरीय कुमार गट कबड्डी स्पर्धा नवोदित, श्री संस्कृती प्रतिष्ठान, गोलफादेवी व आकांक्षा संघांची उपांत्यपूर्व फेरीत दमदार वाटचाल

 


स्व. अनंतशेठ नागवेकर चषक” जिल्हास्तरीय कुमार गट कबड्डी स्पर्धा

 

नवोदित, श्री संस्कृती प्रतिष्ठान, गोलफादेवी व आकांक्षा संघांची उपांत्यपूर्व फेरीत दमदार वाटचाल

 

मुंबई | जुनी प्रभादेवी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आयोजित आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शाखा क्र.१९३ पुरस्कृत “स्व. अनंतशेठ नागवेकर चषक कुमार गटजिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेचा आज तिसरा दिवस रंगतदार लढतींनी गाजला. मुंबई शहर कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने स्व. शीला खाटपे मॅटवरील सामन्यांमध्ये नवोदित, श्री संस्कृती प्रतिष्ठान, गोलफादेवी आणि आकांक्षा या संघांनी उपांत्यपूर्व फेरीत दमदार प्रवेश केला.

 

नवोदित संघाची जोरदार खेळी

पहिल्या सामन्यात ना. म. जोशी मार्गच्या नवोदित संघाने श्री साई क्लबवर ४५-२२ अशी दणदणीत मात करत उपांत्यपूर्व फेरी गाठली. सिद्धेश पाटीलच्या दोन शानदार टिपांमुळे नवोदितने ६व्या मिनिटालाच लोण देत १३-०४ अशी आघाडी घेत सामन्यावर वर्चस्व गाजवले. स्वप्नील पाटील आणि अथर्व सुवर्णा यांच्या पकडी व चढाईच्या सुरेख कामगिरीमुळे हा विजय साकार झाला. श्री साईकडून अरुण पुलवलेचा खेळ लक्षणीय ठरला.

 

श्री संस्कृती प्रतिष्ठानचा चुरशीचा विजय

दुसऱ्या सामन्यात श्री संस्कृती प्रतिष्ठानने समर्थ स्पोर्ट्सचा कडवा प्रतिकार ४९-३७ असा मोडून काढला. अमित वर्मा, दानिश अन्सारी आणि आयुष कनोजिया यांच्या अष्टपैलू खेळामुळे संस्कृतीला विजय प्राप्त झाला. सामन्यात चुरस तेव्हा वाढली, जेव्हा समर्थच्या श्रेयस बेटकरने एकाच चढाईत ३ गडी टिपत लोण दिला, पण अखेर विजयाच्या समीप येऊनही समर्थ संघ पिछाडीवरच राहिला.

 

गोलफादेवीचा थरारक ‘कमबॅक’ विजय

तिसरा सामना सर्वाधिक थरारक ठरला. गोलफादेवीने वीर संताजी संघाचा ५७-५६ असा निसटता पराभव करत चाहत्यांची मने जिंकली. सुरुवातीस अनिकेत विचारे व रिजवान शेखच्या उत्कृष्ट खेळामुळे वीर संताजीने लोण देत १२-०२ अशी आघाडी घेतली होती. मात्र दुसऱ्या डावात सनी कोळी आणि विनमरा लाड यांनी गोलफादेवीच्या खेळात चैतन्य भरून हा थरारक सामना फिरवला. दोन्ही संघांनी अर्धशतक पार करत टाळ्या मिळवल्या, मात्र लोण फक्त एकेकच नोंदविले गेले.

 

आकांक्षाची यशस्वी आगेकूच

दिवसाचा शेवटचा सामना आकांक्षा मंडळ आणि यश मंडळ यांच्यात झाला. आकांक्षा संघाने ३६-२५ अशा फरकाने विजय मिळवत उपांत्यपूर्व फेरी गाठली. स्वप्नील पाटील व व्यंकट साळुंखे यांनी उत्कृष्ट खेळ साकारला, तर यश मंडळाकडून सिद्धार्थ कतरे व केतन चौगुले यांनी चांगली झुंज दिली.

 

आजच्या सामन्यांना विशेष रूप दिलं ते खेळ क्षेत्रातील दिग्गजांच्या उपस्थितीने. अर्जुन पुरस्कार विजेती माया मेहेर, शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त आशा गायकवाड (चव्हाण) व गणेश शेट्टी, तसेच राष्ट्रीय खेळाडू राणा तिवारी, सचिंद्र आयरे, सणस यांचं आगमन झालं आणि खेळाडूंना मोठा उत्साह मिळाला.


Post a Comment

0 Comments