१०वी मित्सुई शोजी टी-२० क्रिकेट स्पर्धा जोरात सुरू!
मुंबई पोलीस सिटी
रायडर्स आणि शिवाजी पार्क वॉरियर्सची दमदार सुरुवात
मुंबई : दहाव्या मित्सुई शोजी टी-२० क्रिकेट स्पर्धेला काल मोठ्या
उत्साहात सुरुवात झाली आणि पहिल्याच दिवशी दोन थरारक सामन्यांनी क्रिकेटप्रेमींना
खुर्चीतून उठवले! गतविजेता मुंबई पोलीस सिटी रायडर्सने घाटकोपर जेट्सवर ४ विकेट्सनी विजय मिळवत
विजयी सलामी दिली, तर शिवाजी पार्क वॉरियर्सने ठाणे मराठाज संघावर ८ विकेट्स
आणि तब्बल ७ षटकं राखून दणदणीत विजय मिळवला.
मुंबई पोलीस सिटी रायडर्स विरुद्ध घाटकोपर जेट्स :
पोलीस जिमखाना मैदानावर झालेल्या उद्घाटन लढतीत
घाटकोपर जेट्सने २० षटकांत ९ बाद
१५१ धावा केल्या. आर्यन पटणी (२६), साई चव्हाण (२५) आणि धानीत राऊत (२२) यांनी योगदान दिलं. मुंबई पोलिसांच्या
गोलंदाजीत योगेश पाटील (२/३७), रोहित बेहरे (२/३२) आणि आर्यराज निकम (२/३०)
यांनी अचूक मारा करत प्रतिस्पर्ध्यांना बांधून ठेवलं.
१५२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना
हर्ष आगाव (४७) आणि योगेश शिंदे
(४१) यांच्या दमदार भागीदारीने रायडर्स संघाने विजयाच्या दिशेने वाटचाल केली.
अखेरच्या षटकात सामन्याने नाट्यमय वळण घेतले, पण प्रज्ञेश लाडच्या विजयी चौकाराने संघाला १९.५ षटकांत विजय
मिळवून दिला. सामनावीर पुरस्कार आर्यराज निकम याला देण्यात आला.
शिवाजी पार्क वॉरियर्स विरुद्ध ठाणे मराठाज :
दुसऱ्या सामन्यात ठाणे मराठाज संघाने २० षटकांत ८ बाद १६९ धावा केल्या. शाश्वत जगतापने ७५ धावांची झणझणीत खेळी
केली, तर सिद्धांत अधटरावने २८ धावांचं योगदान दिलं. शिवाजी
पार्कच्या गोलंदाजांत साईराज पाटील आणि आश्रय संजनानी यांनी प्रत्येकी २ बळी
घेतले.
या धावसंख्येचा पाठलाग करताना शिवाजी पार्क वॉरियर्सच्या
फलंदाजांनी धावांचा पाऊस पाडला. वरून लवांडेने ५९ धावा, तर जयेश पोखरेने नाबाद ७२ धावा करत संघाला केवळ १३ षटकांत २ बाद १७३ धावा करत दणदणीत विजय मिळवून दिला. सामनावीर ठरला –
जयेश पोखरे.
उद्घाटन सोहळा :
स्पर्धेचे औपचारिक उद्घाटन एम.एल.सी. राजहंस सिंग यांच्या हस्ते पार पडले. यावेळी मुंबई क्रिकेट संघटनेचे दीपक पाटील,
अभय हडप यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. या वेळी राजहंस सिंग
यांनी दीपक पाटील यांच्या गोलंदाजीवर फलंदाजी करून क्रिकेटचा आनंदही लुटला.
Post a Comment
0 Comments