Type Here to Get Search Results !

प्रा. डॉ. चंद्रजीत भालचंद्र जाधव – खो-खोचा एक समर्पित दीपस्तंभ, संशोधन, प्रशिक्षण आणि आयोजनातील एक प्रेरणास्त्रोत खो-खोच्या गगनात झळकणारा तेजोदीप

 

प्रा. डॉ. चंद्रजीत भालचंद्र जाधव – खो-खोचा एक समर्पित दीपस्तंभ


 संशोधन, प्रशिक्षण आणि आयोजनातील एक प्रेरणास्त्रोत

खो-खोच्या गगनात झळकणारा तेजोदीप

 

खो-खो... एक खेळ जो केवळ मैदानावर चालत नाही, तर हृदयाच्या ठोक्यांवर धावतो! "धावणाऱ्या पावलांमध्ये स्वप्नांची दिशा असते, आणि समर्पित प्रशिक्षकाच्या नजरेत भविष्याचा वेध असतो." खो-खो या पारंपरिक भारतीय खेळात, खो-खोच्या धावत्या विश्वात, संशोधन, संघटन, प्रशिक्षण आणि नेतृत्व या चारही बाजूंनी तेजस्वी प्रकाश देणारे नामवंत व्यक्तिमत्त्व म्हणजे प्रा. डॉ. चंद्रजीत भालचंद्र जाधव.

 


त्यांनी खेळाला केवळ उर्जा दिली नाही, तर शिस्त, शास्त्र आणि संवेदनशीलतेची किनार दिली. त्यांच्या कार्याने खो-खो खेळाने राज्याच्या सीमा ओलांडून देश व जागतिक व्यासपीठ गाजवले आहे. संशोधन, प्रशिक्षण व आयोजनाच्या त्रिसूत्रीवर आधारित असलेली त्यांची वाटचाल म्हणजे एक दीपस्तंभ, ज्याच्या प्रकाशात असंख्य खेळाडूंचे भविष्य उजळले. त्यांच्या प्रत्येक हालचालीत विज्ञान आणि समर्पणाचं मर्म गुंफणारा एक व्यक्तिमत्त्व म्हणजेच खो-खो क्षेत्रातील एक झळाळता दीपस्तंभ! त्यांच्या कर्तृत्वाच्या अनेक पायऱ्या ही त्यांच्या अथक प्रयत्नांची, ध्येयासक्तीची आणि ज्ञानाच्या अमर्याद झंकाराची साक्ष देतात. डॉ. जाधव यांचे आयुष्य म्हणजे महाराष्ट्राच्या खो-खोला देश व जागतिक गौरवाचे पंख देणारा यज्ञ ठरले आहे. "त्यांनी खेळाला शास्त्र दिले, खेळाडूंना दिशा दिली, आणि व्यवस्थेला मूल्यनिष्ठ नेतृत्व दिले."

 


शैक्षणिक तेजस्विता आणि मार्गदर्शन

बीएससी, एमए, एमपीएड, पीएचडी अशा बहुविध पदव्या प्राप्त करून त्यांनी शिक्षणाची उंची गाठली. ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद जे. जे. टी. यू. विद्यापीठ झुनझुन, राजस्थान येथे पीएचडी पूर्ण केली. त्यांचा शैक्षणिक दृष्टिकोन 'खेळ म्हणजे शारीरिक हालचाल नव्हे, तर बौद्धिक प्रगल्भता' ही भूमिका मांडतो.


 

पुरस्कारांचा सुगंध – यशाचा सुवर्णमहोत्सव

सन्मानांची शिखरे पादाक्रांत करणारे... प्रा. डॉ. चंद्रजीत जाधव! कृतीतून कर्तृत्व सिद्ध करणाऱ्या व्यक्तिमत्त्वांची ओळख त्यांच्या गौरवांनी होते. प्रा. डॉ. चंद्रजीत भालचंद्र जाधव यांचे कार्य हे केवळ प्रशिक्षणापुरते मर्यादित न राहता, ते नेतृत्व, संघटन, संशोधन आणि समाजप्रबोधन यांना लाभलेले एक उगमस्थान आहे. त्यांच्या या बहुआयामी कार्याची दखल घेत विविध पातळ्यांवर त्यांना सन्मानित करण्यात आले आहे:

 


शिवछत्रपती राज्य क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार (२००९-१०)

महाराष्ट्र शासनाच्या वतीने दिला जाणारा सर्वोच्च क्रीडा सन्मान. या पुरस्काराने त्यांच्या प्रशिक्षकीय क्षमतेला मान्यता मिळाली. हा पुरस्कार म्हणजे त्यांच्या कष्ट, शिस्त व निष्ठेचे सिंहावलोकन होय.

 


गुणवंत जिल्हा क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार (२००४-०५)

ताळागाळातून वरच्या पातळीपर्यंत गुणवत्तापूर्ण कार्य करणाऱ्या व्यक्तींचा गौरव करणारा हा पुरस्कार डॉ. जाधव यांच्या कार्याची सुरुवातीची पावती ठरली. खो-खोसाठी झिजणाऱ्या कार्यकुशलतेला मिळालेली पहिली मोठी पावती!

 


गुणवंत क्रीडा संघटक कार्यकर्ते पुरस्कार (२०१२-१३)

केवळ खेळाडू घडविणेच नव्हे, तर संघटनात्मक बांधणी, नियोजन व यशस्वी आयोजन यामध्येही त्यांनी आपली चुणूक दाखवली. या भूमिकेतील यशाचे द्योतक म्हणजे हा सन्मान ठरला आहे.

 


मा. मुख्यमंत्री गौरव पत्र (१९९९)

तरुण वयातच कार्यकुशलतेचा ठसा उमटवणाऱ्या डॉ. जाधव यांना महाराष्ट्र राज्याचे मा. मुख्यमंत्री यांच्या कडून गौरवपत्र देऊन सन्मान केला गेला. हे गौरवपत्र म्हणजे त्यांच्या सार्वजनिक क्षेत्रातील सामाजिक योगदानाची अधिकृत पोचपावती!

 


सन्मान म्हणजे केवळ बक्षीस नव्हे, तर जबाबदारीची साक्ष!

प्रत्येक पुरस्काराने डॉ. जाधव यांचे कार्य अधिक गतिमान आणि परिणामकारक झाले. त्यांच्या जीवनप्रवासातील हे सन्मान म्हणजे प्रेरणा देणाऱ्या दीपस्तंभासारखे आहेत, जे नव्या पिढीतील प्रशिक्षकांना आणि खेळाडूंना मार्गदर्शन करतात. त्यामुळेच प्रा. डॉ. चंद्रजीत जाधव म्हणजे एक नाव, एक प्रेरणा, एक विचारधारा यांचा संगम आहे असेच म्हणावे लागेल. हे पुरस्कार म्हणजे खेळाच्या मातीला त्यांनी दिलेला सुवर्णस्पर्श व  त्यांच्या कार्याचा सुवर्णलेपित ठसा होय!

 


लेखनातून ज्ञानाचा प्रकाश

त्यांनी क्रीडाविषयक ४ पुस्तके प्रकाशित केली, ज्यांनी शालेय शिक्षणापासून जागतिक क्रीडाविचारांपर्यंत विस्तृत ज्ञान दिले. हे लिखाण तेवढेच प्रखर आहे: १. ॲटीट्यूड ऑफ स्कूल स्टूडेंट्स टूवर्ड्स फिजिकल एज्युकेशन, २. अंडरस्टँडिंग द जेंटलमन्स गेम, ३. आरोग्य शिक्षण , ४. पर्सनॅलिटी डिफरन्स ऑफ कबड्डी

 


ही पुस्तके म्हणजे खेळाकडे पाहण्याची एक नवी दृष्टी, नवसंवेदना ठरते आहे. हे केवळ लेख नव्हते – तर खेळाच्या नव्या विचारांची बीजं होती, ज्यातून नव्या संकल्पनांचे अंकुर फुटले.

 


संशोधनाचा सशक्त पाया – खेळाच्या मूलगामी उभारणीस शास्त्रीय पायाभरणीचा आधार :

शोधाशोध ही त्यांच्या रक्तात भिनलेली सवयच जणू. त्यांनी केलेल्या संशोधनाच्या माध्यमातून खो-खोच्या तंत्राचा प्रत्येक कण तेवत ठेवला आहे. त्यांचा शोधनिबंधांचा ठेवा म्हणजे खेळाच्या गाभ्याची वैचारिक उकल  व हे संशोधन लेख त्याचे साक्षीदार आहेत. क्रीडा क्षेत्रातील अभ्यास, निरीक्षण आणि सखोल विचारसरणी यांच्या आधारावर त्यांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर एकूण ३९ संशोधन लेख प्रसिद्ध करून आपले प्रज्ञाशक्तीचे दर्शन घडवले.

 


३० राष्ट्रीय स्तरावरील संशोधन लेखजिथे त्यांनी खो-खोचा शास्त्रीय, शारीरिक व मानसिक बाजूने सखोल अभ्यास मांडला.

 

०९ आंतरराष्ट्रीय स्तरावरील लेखज्यांनी भारतीय खो-खोचा झेंडा सातासमुद्रापार रोवला!

 

हे केवळ लेख नव्हते – तर खेळाच्या नव्या विचारांची बीजं होती, ज्यातून नव्या संकल्पनांचे अंकुर फुटले. तसेच ही केवळ संख्या नाही, तर भारतीय खेळसंस्कृतीचा जागतिक संवाद आहे.

 

प्रशिक्षण – स्वप्नांना दिशा देणारा हात, खेळाडूंना घडवणारा आत्म्याचा स्पर्श

शिक्षक असतो मार्गदर्शक, पण हा प्रशिक्षक होता एक शिल्पकार... प्रशिक्षक म्हणजे विचारांचा शिल्पकार, आणि त्यांनी हे काम उत्कटतेने केले. "स्वप्न पाहणाऱ्यांना वाट सापडते, पण स्वप्न साकार करणाऱ्यांच्या पावलांवर इतिहास चालतो." त्यांच्या नेतृत्वाखाली घडलेले खेळाडू केवळ मैदानात चमकले नाहीत, तर त्यांनी सर्वोच्च गौरव प्राप्त करत नाव इतिहासात कोरले. त्यांनी घडवलेले खेळाडू हे त्यांच्या समर्पित तपश्चर्येचे जिवंत मूर्तिमंत उदाहरण आहेत. त्यांनी १२९ राष्ट्रीय खेळाडू व ४ आंतरराष्ट्रीय खेळाडू घडवले आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाने घडलेले खेळाडू केवळ स्पर्धा जिंकून थांबले नाहीत, तर त्यांनी शिवछत्रपती अर्जुन पुरस्कार यांसारखे प्रतिष्ठेचे पुरस्कार मिळवून त्यांना व खेळला गौरवले.

 

खेळाच्या पिढ्यांना घडवणारा कारखाना

त्यांच्या मार्गदर्शनात घडलेल्या सौ. सारिका काळे यांना शिवछत्रपती तसेच अर्जुन पुरस्कार मिळाले. याशिवाय सौ. सुजाता शामने, सौ. रोहिणी आवारे, सौ. सुप्रिया गाढवे या खेळाडूंनाही शिवछत्रपती पुरस्कार लाभला. हे सर्व खेळाडू म्हणजे त्यांच्या कार्याचा ठसा आणि त्यागाची साक्ष देणारी रत्ने आहेत. हे खेळाडू म्हणजे चालते-बोलते गौरवपुस्तक! हे सर्व खेळाडू म्हणजे त्यांच्या तपश्चर्येचे मूर्त स्वरूप आहेत. त्यांच्या मार्गदर्शनात खेळाडूंनी केवळ यश मिळवलं नाही, तर भारतीय खो-खोची झळाळी परदेशात नेली.

 

संघटनशक्ती – क्रीडाक्षेत्रातील नेतृत्व, सन्माननीय पदे व जबाबदाऱ्या

ते केवळ प्रशिक्षक नाहीत, ते खेळाच्या मंदिराचे पुरोहित आहेत. खेळात विज्ञानाचा श्वास, तंत्रज्ञानाची दिशा आणि मनोविज्ञानाचा स्पर्श जोडणारे द्रष्टे विचारवंत, संशोधक आणि संघटक म्हणून त्यांचा लौकिक आहे. त्यांची संघटन कौशल्ये म्हणजे खेळाच्या व्यवस्थेची मजबूत मूळं:

 

सरचिटणीस : महाराष्ट्र खो खो असोसिएशन सन २०१० ते २०१८, सन २०२४ ते २०२८

सहसचिव : भारतीय खो खो महासंघ सन २०१७ ते आज पर्यंत

उपाध्यक्ष : महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन २०२२ ते आज पर्यंत

कार्यकारणी सदस्य : महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन २०१४ ते २०२१

संयुक्त चिटणीस : महाराष्ट्रखो खो असोसिएशन सन २००६ ते २०१०

अध्यक्ष : उस्मानाबाद जिल्हा खोखो असोसिएशन सन २००६ ते २०१७

उपाध्यक्ष : उस्मानाबाद जिल्हा बेसबॉल असोसिएशन

उपाध्यक्ष : उस्मानाबाद जिल्हा स्विमिंग असोसिएशन

अध्यक्ष : भारतीय खो खो संघ निवड समिती सन २०२१ ते २०२३

समन्वयक : पुरस्कार समिती भारतीय खो खो महासंघ सन २०१३ ते २०१७

अभ्यास मंडळ सदस्य : क्रीडा व शारीरिक शिक्षण डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद सन २०१३ ते २०२१

अभ्यास मंडळ सदस्य : क्रीडा व शारीरिक शिक्षण अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ सोलापूर सन २०१७ ते २०२१

अध्यक्ष : श्री तुळजाभवानी क्रीडा प्रबोधिनी उस्मानाबाद

सचिव : छत्रपती व्यायाम प्रसारक मंडळ उस्मानाबाद

विविध पदांवर कार्य करत खेळाच्या प्रत्येक अंगणात परिवर्तनाची हवा निर्माण केली.

 

आयोजन कौशल्य – स्पर्धांचा आत्मा, नेतृत्वाची सुवर्णछाया

मैदानावर खेळ मांडणं आणि परिपूर्णता साधणं हे त्यांच्या अंगीच होतं. आयोजन म्हणजे एका खेळाच्या आत्म्याला शरीर देणं – आणि त्यांनी हे कार्य परिपूर्णतेच्या सर्वोच्च टप्प्यावर नेलं. त्यातूनच त्यांनी सहा राष्ट्रीय स्पर्धा, सात राज्यस्तर स्पर्धा व पाच कै. भाई नेरुरकर चषक स्पर्धांचे यशस्वी आयोजन करून एक वेगळे मापदंड खो-खो क्षेत्रात निर्माण केले आहे. त्यांनी सुसंस्कृत व प्रेरणादायी आयोजनाचा नवीन मानदंड स्थापन केला. या स्पर्धांच्या आयोजनांमधून त्यांनी नियमिततेला नवनिर्मितीचा शृंगार दिला.

                        

खेळाशी समरस, समाजाशी समर्पित

खो-खो जसजसा आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहचला तस तश्या त्यांच्यावर विविध जबाबदाऱ्या दिल्या. त्यांनी हा खेळ विविध देशांत पोहोचवण्यात मोलाचा वाटा उचलला आहे. तसेच विविध राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय व पहिल्या विश्वचषक खो खो स्पर्धेत स्पर्धा संचालक हे मानाचे पद भूषविले आहे.

 

प्रा. डॉ. चंद्रजीत जाधव हे केवळ एक प्रशिक्षक नाहीत, तर खेळाला शास्त्र, शिस्त आणि संवेदना यांची ओळख करून देणारे आगळे वेगळे व्यक्तिमत्व आहे. त्यांनी दिलेले योगदान हे खो-खोचं भविष्य उजळणारे दीपस्तंभ आहे – एक असे तेज, जे आज लाखो तरुणांच्या मनात प्रेरणादायी ठरते.

 


"त्यांच्या धडपडीला पुरस्कार मिळाले, पण त्यांच्या दृष्टिकोनाला सृष्टी बदलायचं सामर्थ्य लाभलं." असेच म्हणावे लागेल.

 

बाळासाहेब (बाळ) तोरसकर


Post a Comment

0 Comments