नवमित्र क्रीडा मंडळाची सुवर्ण महोत्सवी द्वितीय श्रेणी कबड्डी स्पर्धा
अमर मंडळ, श्री साई क्लब, श्री संस्कृती प्रतिष्ठान व आंबेवाडी मंडळ विजयी सलामी
मुंबई: वरळीच्या नवमित्र क्रीडा मंडळाने “सुवर्ण महोत्सवी”
वर्षानिमित्त द्वितीय श्रेणी (ब) गटातील “स्व. दीपक वेर्लेकर चषक” कुमार गट कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन केले. मुंबई शहर कबड्डी
असोसिएशनच्या मान्यतेने वरळी स्पोर्ट्स क्लबच्या “स्व. यशवंत साळवी मॅट”वरील
क्रीडांगणात अमर मंडळ, श्री साई क्लब, श्री संस्कृती प्रतिष्ठान आणि आंबेवाडी मंडळ यांनी दमदार
कामगिरी सादर करत विजयी सलामी दिली.
अमर मंडळची ताकद
अमर मंडळाने ओम् ज्ञानदीप मंडळावर ३५–२० अशी दणदणीत मात
केली. पूर्वार्धात चुरशीने खेळला गेलेल्या
या सामन्यात ८-६ अशी अमर कडे आघाडी होती. उत्तरार्धात अमरने आपला खेळ गतिमान करीत
ओम् ज्ञानदीपवर २ लोण देत आपला विजय निश्र्चित केला. अनिकेत वारंगच्या आक्रमक
चढायांनी आणि यश येळमकरच्या पकडींनी विजय निश्चित झाला. ओम् ज्ञानदीपचा राकेश परब
चमकला.
श्री साई क्लबचा प्रतिस्पर्ध्यांना शिक्का
श्री साई क्लबने प्रेरणा मंडळाला ३७–३२ ने पराभूत केले. विश्रांतीला
२३-१६ अशी आघाडी घेणाऱ्या श्री साईला विश्रांतीनंतर विजयासाठी प्रेरणाने चांगलेच झुंजविले. शेवटी ५गुणांनी
साईने विजय मिळविला. तेजस गायकवाड व निलेश यांच्या चढाई-खेळामुळे श्री साई कडून सामन्यावर
पूर्ण वर्चस्व मिळवले. तर रोहित गुरव, चेतन वसकर यांनी प्रेरणा कडून उत्कृष्ट खेळ केला.
श्री संस्कृती प्रतिष्ठानचा दमदार खेळ
श्री संस्कृती प्रतिष्ठानने अष्टविनायक मंडळाचा ४०–१७ असा
सहज पराभव करत आपली ताकद सिद्ध केली. पहिल्या सत्रात २लोण देत २४-११ अशी आघाडी
घेणाऱ्या संस्कृतीने दुसऱ्या सत्रात देखील त्याच जोशात खेळत मोठ्या गुण फरकाने
सामना आपल्या नावे केला. अमन राणा, मनोज गोरे यांच्या तुफानी चढाया, तर रोशन रायाचा
भक्कम बचाव यामुळे हे सोपे गेले. अष्टविनायकचा प्रणील महाडिक बरा खेळला.
आंबेवाडी मंडळाची यशयात्रा
आंबेवाडी मंडळाने शेवटच्या सामन्यात ज्ञानेश्वर मंडळाला
३३-१७ असे नमविले. पूर्वार्धात २ लोण देत २३-०७ अशी भक्कम आघाडी घेणाऱ्या
आंबेवाडीने उत्तरार्धात सावध खेळ करीत आपला विजय साकारला. आंबेवाडीच्या या विजयात
साहिल शेलारने एका चढाईत ३ गडी टिपत मोलाचा वाटा उचलला. त्याला धनंजय निजामपूरकर
याची उत्तम साथ लाभली. ज्ञानेश्वरच्या प्रणय कनेरकर एकाकी लढला.
उद्घाटन व प्रमुख पाहुणे
शिवसेनेचे विभाग प्रमुख आशिष चेंबूरकर यांच्या हस्ते
उद्घाटन झाले त्यावेळी निरंजन नलावडे, राष्ट्रीय खेळाडू व प्रशिक्षक सुशील ब्रीद, राष्ट्रीय
खेळाडू विजय जावळेकर, स्पर्धा निरीक्षक महेंद्र
हळदणकर, मंडळाचे अध्यक्ष जयराम मेस्त्री, सचिव विक्रम बालन, नारायण पाटील - गुरुजी आदी मान्यवर उपस्थित होते.
Post a Comment
0 Comments