Type Here to Get Search Results !

डॉ. बाबासाहेब आंबेडकर टी-ट्वेन्टी क्रिकेट स्पर्धा भरत पाटीलच्या तडाखेबाज धमाका आणि भावेश चौहानच्या भेदक माऱ्याच्या जोरावर विवा सुपर मार्केट एससी सेमीफायनलमध्ये दाखल!


डॉ. बाबासाहेब आंबेडकर टी-ट्वेन्टी क्रिकेट स्पर्धा

भरत पाटीलच्या तडाखेबाज धमाका आणि भावेश चौहानच्या भेदक माऱ्याच्या जोरावर विवा सुपर मार्केट एससी सेमीफायनलमध्ये दाखल!

मुंबई, ८ एप्रिल: भरत पाटीलच्या नाबाद झंझावाती अर्धशतकसमान खेळी आणि भावेश चौहानच्या घातक स्पेलच्या जोरावर विवा सुपर मार्केट एससीने ऑटोमोटिव्ह मॅन्युफॅक्चरर्स एससीवर ९१ धावांनी दणदणीत विजय मिळवत सेमीफायनलमध्ये आपलं स्थान पक्कं केलं. हा उपांत्यपूर्व सामना चेंबूरच्या आरसीएफ स्पोर्ट्स क्लब मैदानावर रंगला.

 

नाणेफेक गमावल्यानंतर विवा सुपरमार्केटने प्रथम फलंदाजी करत २० षटकांत ८ बाद १७१ धावा केल्या. सुरुवातीला काही झटपट विकेट्स गेल्यानंतर मधल्या फळीतील फलंदाजांनी स्थिरता राखली. मात्र, खऱ्या अर्थाने शोभा वाढवली ती सातव्या क्रमांकावर आलेल्या भरत पाटीलने. त्याने केवळ २१ चेंडूंमध्ये ५ चौकार आणि २ षटकारांसह नाबाद ४५ धावा करत संघाला भक्कम स्कोअरकडे नेलं. श्रेयस गुरव (२९), सौरभ पवार (२३) आणि ऋतुराज (२०) यांनीही योगदान दिलं. ऑटोमोटिव्हकडून अख्तर शेखने ३/२४ आणि योगेश सावंतने २/१६ अशी चांगली कामगिरी केली.

 

लक्ष्याचा पाठलाग करताना ऑटोमोटिव्हचा डाव अवघ्या ११ षटकांत ८० धावांत कोसळला. केवळ जश गनिगा (२५) आणि राहुल केसरी (१६) यांनाच दोन आकडी धावा करता आल्या. बाकी फलंदाजांना भावेश चौहान (६/१६) आणि अमोल भगत (२/२९) यांच्या धारदार गोलंदाजीसमोर टिकता आलं नाही.

 

संक्षिप्त धावफलक:

विवा सुपरमार्केट एससी२० षटकांत ८ बाद १७१, (भरत पाटील नाबाद ४५, श्रेयस गुरव २९; अख्तर शेख ३/२४, योगेश सावंत २/१६)


ऑटोमोटिव्ह मॅन्युफॅक्चरर्स एससी११ षटकांत ८०, (जश गनिगा २५; भावेश चौहान ६/१६, अमोल भगत २/२९)

 

निकाल: विवा सुपरमार्केट एससी ९१ धावांनी विजयी.


Post a Comment

0 Comments