Type Here to Get Search Results !

डॉ. बाबासाहेब आंबेडकर टी-ट्वेन्टी क्रिकेट स्पर्धा साईच्या दमदार अर्धशतकाच्या जोरावर मफतलाल क्रिकेट क्लब उपांत्य फेरीत


 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर टी-ट्वेन्टी क्रिकेट स्पर्धा

साईच्या दमदार अर्धशतकाच्या जोरावर मफतलाल क्रिकेट क्लब उपांत्य फेरीत

मुंबई, 7 एप्रिल: साईच्या नाबाद 83 धावांच्या जोरावर आणि त्रिसूत्री गोलंदाजीच्या बळावर मफतलाल क्रिकेट क्लबने ग्रेटर मुंबई पोलीस क्लब अ संघावर 48 धावांनी मात करत उपांत्य फेरीत दमदार प्रवेश केला. चेंबूर येथील आरसीएफ स्पोर्ट्स क्लबवर हा उपांत्यपूर्व सामना रंगला.

 

नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना मफतलाल सीसीने 20 षटकांत 5 बाद 189 धावा केल्या. सुरुवातीला झटपट दोन गडी बाद झाले तरी तिसऱ्या क्रमांकावरील यष्टिरक्षक साईने जबरदस्त 83 धावांची नाबाद खेळी (52 चेंडू, 10 चौकार, 2 षटकार) करत डाव सावरला.


कर्णधार विश्वजीत जगदाळे (36 धावा, 23 चेंडू) आणि सौरभ सिंग (28 धावा, 13 चेंडू) यांनी साईला दमदार साथ दिली. ग्रेटर पोलिसांकडून योगेश पाटीलने 2/26 अशी कामगिरी केली.

 

189 धावांच्या लक्षाचा पाठलाग करताना ग्रेटर मुंबई पोलीस संघाचा डाव 18.1 षटकांत 141 धावांत आटोपला.


हर्ष अघावने 52 धावांची (37 चेंडू, 6 चौकार, 2 षटकार) लढवय्यी खेळी केली, पण इतर फलंदाज अपयशी ठरले.


मफतलालकडून अथर्व पुजारी (3/38), यश सिंग (3/11) आणि कार्तिक मिश्रा (3/36) यांनी मिळून संपूर्ण संघाला गुडघे टेकायला लावले.

 

संक्षिप्त धावफलक:

मफतलाल सीसी – 20 षटकांत 5 बाद 189, (साई नाबाद 83, जगदाळे 36, सिंग 28; योगेश पाटील 2/26)


ग्रेटर मुंबई पोलीस क्लब अ – 18.1 षटकांत 141, (हर्ष अघाव 52; पुजारी, सिंग, मिश्रा प्रत्येकी 3 बळी)

 

निकाल: मफतलाल क्रिकेट क्लब 48 धावांनी विजयी

Post a Comment

0 Comments