५७ वी पुरुष व महिला राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धा २०२४-२५
महाराष्ट्राच्या दोन्ही संघांची राष्ट्रीय खो-खो स्पर्धेत
विजयी सलामी
पुरी (ओडिशा), दि. १ एप्रिल : महाराष्ट्राच्या पुरुष व महिला संघांनी ५७ व्या वरिष्ठ
राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धेत दमदार सुरुवात करत पहिल्याच फेरीत विजय
मिळवले. पुरुष संघाने लडाख व पंजाबचा पराभव करून गटात आघाडी घेतली, तर
महिला संघाने तेलंगणावर प्रभावी विजय मिळवत चुरस निर्माण केली. यंदा ही राष्ट्रीय
स्पर्धा अल्टीमेट लीग पद्धतीने खेळवली जात असल्याने
रोमांचक लढती पाहायला मिळत आहेत.
महिला संघाची विजयी घोडदौड
पुरी येथील जिल्हा क्रीडा संकुलात सुरू झालेल्या स्पर्धेत
महाराष्ट्राच्या महिला संघाने तेलंगणाचा २९-१२ असा एक डाव
राखून १७ गुणांनी पराभव केला. महाराष्ट्राच्या प्रियांका इंगळेने ८ गडी बाद करत आक्रमणात
चमक दाखवली. संध्या सुरवसे (३.३० मिनिटे संरक्षण) आणि दीपाली राठोड
(२.१० मिनिटे संरक्षण) यांनी उत्कृष्ट बचाव केला. संपदा मोरे (२
मिनिटे व ४ गुण) व सुहानी धोत्रे (१.३० मिनिटे नाबाद व ४ गुण) यांनी संघाच्या
विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. तेलंगणाकडून कात्रावती अनुषाने ४ गुण मिळवले, मात्र
त्यांच्या संघाचा बचाव अपुरा ठरला.
पुरुष संघाची दणदणीत कामगिरी
महाराष्ट्राच्या पुरुष संघाने पहिल्या सामन्यात लडाखचा
४६-२० असा एक डाव व २६ गुणांनी धुव्वा उडवला. कर्णधार लक्ष्मण
गवसने १२ गडी बाद करीत १.१० मिनिटे संरक्षण करताना अष्टपैलू खेळ
केला. रुद्र थोपटे (१.१० मिनिटे व ८ गुण), रविकिरण
कचवे (१.४० मिनिटे व २ गुण), मिलिंद चवरेकर (१.२० मिनिटे नाबाद व ६ गुण), नरेंद्र
कातकडे (१.१० मिनिटे व ६ गुण) यांनीही प्रभावी कामगिरी केली. लडाखकडून मोहम्मद
अब्बासने एकाकी झुंज दिली.
दुसऱ्या सामन्यात महाराष्ट्राने पंजाबचा
३८-१९ असा एक डाव व २४ गुणांनी पराभव केला. यात अनिकेत
चेंदवणेकर (२.३० मिनिटे, ३.१० मिनिटे संरक्षण व ४ गुण), विजय
शिंदे (४ गुण), प्रतीक वाईकर (१.१० मिनिटे नाबाद संरक्षण व ८ गुण), ऋषिकेश
मुर्चावडे (१.१० मिनिटे संरक्षण) यांनी संघाच्या विजयात महत्त्वाचा वाटा उचलला. पंजाबकडून
जीवन सिंग (१.१० मिनिटे संरक्षण) आणि रेहान खान (४ गुण) यांनी चांगला खेळ केला, पण
संघाला विजय मिळवता आला नाही.
विदर्भ, कोल्हापूर आणि महाराष्ट्र पोलिसांचे दमदार प्रदर्शन
विदर्भ, कोल्हापूर आणि महाराष्ट्र पोलिसांच्या संघांनीही सलामीच्या
सामन्यात प्रभावी विजय मिळवले.
आजचे अन्य निकाल:
पुरुष गट: कर्नाटका
वि. गुजरात ३६-१५, ओडिशा
वि. मध्य भारत २२-१६, रेल्वे
वि. मणिपूर ३०-१६, महाराष्ट्र
पोलिस वि. मध्य प्रदेश ४०-२२, कोल्हापूर
वि. हरियाणा ४४-१९, विदर्भ
वि. झारखंड ४५-१०.
महिला गट: कोल्हापूर
वि. मध्यप्रदेश ४४-१०, विदर्भ
वि. बिहार ४८-४, कर्नाटका
वि. हिमाचल ३८-१०, केरळ
वि. आसाम ३२-१०, महाराष्ट्र
पोलिस वि. आसाम १९-९
Post a Comment
0 Comments