टेबलटेनिसमध्ये महाराष्ट्राचा पदकांचा षटकार,
पदकतक्यात पाचव्या
स्थानावर
कोल्हापूरच्या खेळाडूंचा झेंडा फडकला,
दत्तप्रसाद,
रिशित,
विश्वचे सुवर्णपदक
नवी दिल्ली : खेलो इंडिया पॅरा स्पर्धेच्या समारोपाच्या दिवशी
महाराष्ट्राच्या खेळाडूंनी टेबलटेनिसमध्ये पदकांचा षटकार झळकावत शानदार कामगिरी
केली. 18
सुवर्णांसह एकूण 43 पदकांची कमाई करत महाराष्ट्राने पदकतक्यात पाचवे स्थान
पटकावले. विशेषतः कोल्हापूरच्या खेळाडूंनी शानदार प्रदर्शन करत राज्यासाठी सुवर्ण
कामगिरीची सांगता केली.
इंदिरा गांधी क्रीडा संकुलात पार पडलेल्या टेबलटेनिस
स्पर्धेत महाराष्ट्राने तीन सुवर्ण आणि तीन कांस्यपदके जिंकली. मुंबईच्या रिशित
नथवानी,
तसेच कोल्हापूरच्या दत्तप्रसाद चौगुले व विश्व तांबे यांनी
सुवर्णपदक पटकावले, तर विवेक मोरे, वैष्णवी सुतार आणि पृथ्वी बर्वे यांनी कांस्यपदक जिंकले. विशेष म्हणजे
दत्तप्रसाद आणि विश्वने सलग दुसऱ्या वर्षी सुवर्ण यशाची पुनरावृत्ती केली.
टेबलटेनिस प्रकारात सर्वसाधारण विजेतेपदाचाही मान महाराष्ट्राने मिळवला.
महाराष्ट्राची पदकांची लयलूट
दिल्लीतील खेलो इंडिया पॅरा स्पर्धेच्या दुसऱ्या पर्वात
महाराष्ट्राने गतवर्षीच्या तुलनेत अधिक सरस कामगिरी केली. यंदा 18
सुवर्ण, 13 रौप्य आणि 12 कांस्य अशी एकूण 43 पदके महाराष्ट्राच्या खात्यात जमा झाली. मागील स्पर्धेत 12
सुवर्णांसह 35 पदके जिंकणाऱ्या महाराष्ट्राने यंदा मोठी झेप घेतली.
अॅथलेटिक्समध्ये सर्वाधिक 23, बॅडमिंटनमध्ये 4, नेमबाजीत 3, आर्चरीत
2,
पॉवरलिफ्टिंगमध्ये 5 आणि टेबलटेनिसमध्ये 6 अशी पदकांची कमाई झाली. हरियाणाने 104
पदकांसह सर्वसाधारण विजेतेपद पटकावले.
सुवर्णवीरांची चमकदार कामगिरी
टेबलटेनिस प्रकारात महाराष्ट्राच्या खेळाडूंनी दमदार
कामगिरी करत पदके मिळवली. मुंबईच्या रिशित नथवानीने पुरुष सी-5
प्रकारात उत्तर प्रदेशच्या अभिषेक कुमार सिंगला 11-7,
11-6, 11-6 अशा सरळ गेम्समध्ये
पराभूत करत सुवर्णपदक पटकावले. रिशितने पहिल्यांदाच खेलो इंडिया स्पर्धेत सुवर्ण
जिंकले. 2017
मध्ये कबड्डी खेळताना झालेल्या दुखापतीमुळे त्याला
अर्धांगवायू झाला. मात्र, त्याच्या आई विधी नथवानी यांनी त्याला टेबलटेनिसकडे वळवले आणि आज तो पॅरा
खेळाडू म्हणून नावलौकिक मिळवत आहे.
कोल्हापूरच्या दत्तप्रसाद चौगुलेने पुरुष सी-9
प्रकारात हरियाणाच्या रविंद्र यादवला 11-4,
11-5, 11-5 अशा सरळ गेम्समध्ये
पराभूत करत सलग दुसऱ्या वर्षी सुवर्णपदक जिंकले. दत्तप्रसाद उजव्या हाताने अधू
असून तो बेंगळुरूमधील दिनेश जय बालकृष्णन यांच्या अॅकॅडमीत प्रशिक्षण घेत आहे.
गेल्या चार वर्षांपासून दिनेश सरांनी त्याच्या प्रशिक्षणासह आर्थिक जबाबदारी
उचलल्यामुळे हे यश मिळवता आल्याचे दत्तप्रसादने सांगितले. आगामी पॅरा आशियाई
स्पर्धा आणि पॅरालिम्पिकसाठी तो तयारी करत आहे.
इंजिनिअरिंगचे शिक्षण घेणाऱ्या कोल्हापूरच्या विश्व तांबेने
पुरुष सी-10 प्रकारात
हरियाणाच्या जगन्नाथ मुखर्जीला 11-9, 11-8, 11-4 अशा फरकाने पराभूत करत सुवर्णपदक पटकावले. उजवा पाय लहान
असल्याने अडथळे असूनही विश्वने आपल्या जिद्दीच्या जोरावर राष्ट्रीय आणि
आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये देशाचे प्रतिनिधित्व केले आहे.
कोल्हापूरच्या खेळाडूंचे वर्चस्व
खेलो इंडिया स्पर्धेत कोल्हापूरच्या खेळाडूंनी दमदार
कामगिरी करत पदकांचा चौकार लगावला. नेमबाजी आणि अॅथलेटिक्सनंतर टेबलटेनिसमध्येही
त्यांचा दबदबा पाहायला मिळाला. दत्तप्रसाद चौगुले आणि विश्व तांबे यांनी सुवर्ण तर
वैष्णवी सुतार आणि विवेक मोरे यांनी कांस्यपदक पटकावले. शाहू स्टेडियममध्ये सराव
करणाऱ्या या खेळाडूंनी आपल्या उत्कृष्ट खेळाने राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राच्या
क्रीडा परंपरेला नवा आयाम दिला.
Post a Comment
0 Comments