Type Here to Get Search Results !

अ‍ॅथलेटिक्समध्ये महाराष्ट्राची प्रथमच 23 पदकांची लयलूट, ईश्वरचा सुवर्ण वेध

 


अ‍ॅथलेटिक्समध्ये महाराष्ट्राची प्रथमच 23 पदकांची लयलूट, ईश्वरचा सुवर्ण वेध


नवी दिल्ली : खेलो इंडिया पॅरा स्पर्धेतील अ‍ॅथलेटिक्समध्ये महाराष्ट्राच्या क्रीडापटूंनी ऐतिहासिक कामगिरी करत 10 सुवर्णांसह एकूण 23 पदकांची लयलूट केली. महाराष्ट्रासाठी दहावे सुवर्णपदक पुण्याच्या ईश्वर टाक याने भालाफेक प्रकारात पटकावले.


जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये झालेल्या अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत महाराष्ट्राच्या खेळाडूंनी आपल्या यशाचा झेंडा फडकवला. महाराष्ट्राने पॅरा स्पर्धेत प्रथमच 10 सुवर्ण, 6 रौप्य आणि 7 कांस्यपदकांसह एकूण 23 पदकांची कमाई केली आहे. गत स्पर्धेत महाराष्ट्राने अ‍ॅथलेटिक्समध्ये 7 सुवर्णांसह एकूण 16 पदके मिळवली होती. अकुताई उनभगत आणि भाग्यश्री जाधव यांनी दुहेरी पदक जिंकण्याचा पराक्रम करत अ‍ॅथलेटिक्समध्ये आपली चमक दाखवली. विशेष म्हणजे, प्रथमच पॅरा स्पर्धेत सहभागी होत 12 खेळाडूंनी पदार्पणातच पदक मिळवण्याचा करिष्मा केला. दिल्ली दौर्‍यावर असलेल्या क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे आणि पथकप्रमुख मिलिंद दिक्षीत यांनी खेळाडूंच्या कामगिरीचे कौतुक केले.


अ‍ॅथलेटिक्सच्या एफ-12 प्रकारात 25 वर्षीय ईश्वर टाक याने 62.66 मीटर अंतरावर भाला फेकत सुवर्णपदक जिंकले. भालाफेकच्या एफ-13 प्रकारात महाराष्ट्राच्या प्रतीक पाटील याने 49.01 मीटर अंतरावर भाला फेकत कांस्यपदक मिळवले. ईश्वराचा उजवा डोळा पूर्णपणे निकामी असून डाव्या डोळ्याचीही 50 टक्के दृष्टी कमी आहे. यानंतर तो वर्ल्ड चॅम्पियनशिपसाठी तयारी करणार असल्याचे त्याने सांगितले.



कोल्हापूरच्या स्नेहल बेनाडे हिने महिलांच्या गोळाफेक एफ-12/13 प्रकारात महाराष्ट्रासाठी रौप्यपदक पटकावले. तिने 7.40 मीटर अंतरावर गोळा फेकला. 20 वर्षीय स्नेहल सध्या गोवा येथील आयआयटीमध्ये अभियांत्रिकीच्या दुसऱ्या वर्षाला शिकत आहे. ती तीन वर्षांची असताना भावासोबत खेळत असताना तिच्या हातातील बांगडी क्रशरमध्ये अडकली. ती काढण्याच्या प्रयत्नात तिने आपला डावा हात गमावला. दीड वर्षांपासून तिने गोळाफेक खेळायला सुरुवात केली असून, खेळ आणि शिक्षण दोन्ही सुरू ठेवण्याचा तिचा मानस आहे.



महिलांच्या एफ-56 प्रकारात मीना पिंगाने हिने 17.03 मीटर थाळीफेक करत कांस्यपदक पटकावले. राजश्री कासदेकर हिने भालाफेक एफ-12/13 प्रकारात 20.24 मीटर अंतरावर भाला फेकत कांस्यपदक जिंकले. महाराष्ट्राच्या या ऐतिहासिक पदकविजयाने राज्याच्या अ‍ॅथलेटिक्स क्षेत्रात नवा आदर्श निर्माण केला आहे.

 


Post a Comment

0 Comments