Type Here to Get Search Results !

नेमबाजीत एक दशांश गुणाने स्वरूपने मारली बाजी, महाराष्ट्राला सुवर्णासह रौप्य शेवटच्या शॉटवर गाजवले मैदान, सलग दुसऱ्यांदा सोनेरी यश

 



नेमबाजीत एक दशांश गुणाने स्वरूपने मारली बाजी
, महाराष्ट्राला सुवर्णासह रौप्य

शेवटच्या शॉटवर गाजवले मैदान, सलग दुसऱ्यांदा सोनेरी यश

 

नवी दिल्ली : खेलो इंडिया पॅरा स्पर्धेत शेवटच्या क्षणापर्यंत रंगलेल्या नेमबाजीतील लढतीत महाराष्ट्राच्या स्वरूप उन्हाळकरने अवघ्या एका दशांश गुणाने सुवर्णपदकावर नाव कोरले. 10 मीटर रायफल नेमबाजीतील एस एच 1 प्रकारात स्वरूपसोबतच कविन केगनाळकरनेही रूपेरी यश संपादन केले.

 

डॉ. कर्णीसिंग शूटिंग रेंजवर सुरू असलेल्या या स्पर्धेतील पहिल्याच अंतिम फेरीत महाराष्ट्राच्या दोन्ही नेमबाजांनी चमकदार कामगिरी केली. पात्रता फेरीत कोल्हापूरच्या स्वरूपने चौथा क्रमांक पटकावला होता, तर अंतिम लढतीत त्याने अनुभवाच्या जोरावर 16 व्या फेरीपर्यंत आघाडी घेतली होती. मात्र, 17 व्या फेरीत 9.1 गुण मिळाल्याने तो चौथ्या स्थानी फेकला गेला. याचवेळी अवघ्या 15 वर्षीय कविन केगनाळकरने अप्रतिम कामगिरी करत पहिल्या स्थानावर झेप घेतली.

 

पदक निश्चित करणाऱ्या 20 व्या फेरीत स्वरूपने आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करीत दुसरे स्थान मिळवले. अखेरच्या 23 24 व्या फेरीत सुवर्णपदकासाठी स्वरूप आणि कविन यांच्यात तीव्र चुरस पाहायला मिळाली. 224.2 गुणांसह कविन आघाडीवर होता, तर स्वरूप अवघ्या 0.1 गुणांनी मागे होता. 23 व्या फेरीत गुणांची बरोबरी साधल्यानंतर शेवटच्या 24 व्या फेरीत स्वरूपने 10.7 गुणांचा अचूक वेध घेत सुवर्णपदकावर आपले नाव कोरले.

 

कोल्हापूरच्या स्वरूपने सलग दुसऱ्यांदा खेलो इंडिया स्पर्धेत सुवर्णपदक पटकावण्याचा करिष्मा केला. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणारा स्वरूप या स्पर्धेतील प्रमुख दावेदार होता. पुण्यातील बालेवाडी स्टेडियममध्ये झालेल्या कसून सरावामुळेच हे यश हाती लागल्याचे त्याने सांगितले. “पॅरिसमधील अपयश मागे टाकून या पदकापासून नवी सुरुवात झाली आहे. आशियाई स्पर्धा आणि ऑलिम्पिक पदक हेच माझे पुढील लक्ष्य आहे,” असे स्वरूपने नमूद केले.

 

दरम्यान, नुकतीच दहावीची परीक्षा दिलेल्या सोलापूरच्या कविन केगनाळकरने रौप्यपदकाची लक्षवेधी कामगिरी केली. डावा पाया गुडघ्यापासून नसतानाही कृत्रिम पायाच्या सहाय्याने त्याने हा पराक्रम गाजवला. गत स्पर्धेत पाचव्या स्थानावर समाधान मानावे लागलेल्या कविनने यावेळी अधिक मेहनत घेतल्यानंतर हे यश मिळवल्याचे सांगितले.

 


Post a Comment

0 Comments