Type Here to Get Search Results !

सागर कातूर्डे ठरला ‘भारत श्री’ विजेता! शिर्डीत पार पडलेल्या ६५व्या राष्ट्रीय शरीरसौष्ठव स्पर्धेत दमदार विजय



सागर कातूर्डे ठरला ‘भारत श्री’ विजेता!

शिर्डीत पार पडलेल्या ६५व्या राष्ट्रीय शरीरसौष्ठव स्पर्धेत दमदार विजय

 

शिर्डी : भारतीय शरीरसौष्ठव आणि फिटनेस फेडरेशनतर्फे (IBBFF) आयोजित ६५वी सीनियर नॅशनल बॉडी बिल्डिंग आणि फिटनेस चॅम्पियनशिप शिर्डी येथे भव्यदिव्य स्वरूपात पार पडली. २९ राज्यांतील तब्बल ३७५ शरीरसौष्ठवपटूंनी स्पर्धेत सहभाग घेतला, मात्र अखेर ‘भारत श्री’चा किताब आयकर विभागाच्या सागर कातूर्डे याने पटकावला.

 

स्पर्धेतील तगड्या स्पर्धेमुळे विजेता कोण असेल, याबाबत मोठी उत्सुकता होती. दहा गटातील अव्वल शरीरसौष्ठवपटू अंतिम टप्प्यात पोहोचले, तेव्हा जजेसनाही निर्णय घेणे कठीण झाले होते. मात्र, आपल्या जबरदस्त पोझिंग आणि दमदार स्नायूशक्तीच्या जोरावर सागर कातूर्डेने सेना दलाच्या स्वप्नील नरवडकर, पी.टी. अनबन, मणिपूरच्या रॉबी मैतेयी, महाराष्ट्राच्या हरमित सिंग आणि उमेश गुप्ता यांच्यावर मात करत प्रतिष्ठेचा भारत श्री’ किताब जिंकला.

 

शरीरसौष्ठवाचा ‘पीळदार’ सोहळा

Ø भारतातील सर्वोत्तम शरीरसौष्ठवपटूंची प्रतिष्ठेची स्पर्धा

Ø अंतिम टप्प्यात १० गटविजेत्यांत प्रचंड चुरस

Ø सागर कातूर्डेचा जबरदस्त स्नायू प्रदर्शन आणि पोझिंगने सर्वांना भुरळ

 

विजेत्यांना दुबई आशियाई स्पर्धेसाठी संधी

स्पर्धेतील दहा गटविजेत्यांची दुबई येथे होणाऱ्या आशियाई अजिंक्यपद स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, या खेळाडूंच्या विमान प्रवासाचा खर्च डॉ. संजय मोरे हे उचलणार असल्याची घोषणा त्यांनी बक्षीस वितरण समारंभावेळी केली.

 

भव्य स्पर्धेचे आयोजन व प्रमुख उपस्थिती

स्पर्धेचे आयोजन डॉ. संजय मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली उद्योजक संदीप सोनवणे यांच्या पुढाकाराने पार पडले. या सोहळ्यात साईबाबा संस्थानचे कार्यकारी अधिकारी गोरक्षनाथ गाडीलकर, डीवायएसपी शिरीष ओमणी, एअरपोर्ट अथॉरिटीचे डेप्युटी कमिशनर अमिष कुमार, शरीरसौष्ठव संघटनेचे अजय खानविलकर आणि राजेश सावंत यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments