Type Here to Get Search Results !

७२ वी वरिष्ठ गट राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धा पुणे ग्रामीणसह मुंबई शहर पश्र्चिम, पुणे शहर उपांत्यपूर्व फेरीत

 


७२ वी वरिष्ठ गट राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धा  

पुणे ग्रामीणसह मुंबई शहर पश्र्चिम, पुणे शहर उपांत्यपूर्व फेरीत

 

ठाणे: गतविजेत्या पुणे ग्रामीणसह मुंबई शहर पश्र्चिम आणि पुणे शहर यांनी महिलांच्या गटात, तर पुणे ग्रामीण, मुंबई उपनगर पूर्व आणि कोल्हापूर यांनी पुरुषांच्या गटात ७२ व्या वरिष्ठ गट राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळवला आहे. महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनने विश्वास सामाजिक संस्था व शारदा संकल्प प्रतिष्ठान यांच्या सहकार्याने या प्रतिष्ठित स्पर्धेचे आयोजन केले आहे. ठाणे पश्चिम येथील भारतरत्न माजी पंतप्रधान स्व. अटल बिहारी वाजपेयी क्रीडांगणावर झालेल्या सामन्यांमध्ये रंगतदार झुंज पाहायला मिळाली.

 


महिलांच्या गटात पुणे ग्रामीण, मुंबई शहर पश्र्चिम आणि पुणे शहरचा दमदार विजय

पुणे ग्रामीणने सांगलीला ५४-१६ असा धडाक्यात पराभूत करत उपांत्यपूर्व फेरी गाठली. सामन्याच्या सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ दाखवत पुणे ग्रामीणने पहिल्या डावातच ३ लोण देत ३५-१० अशी मोठी आघाडी घेतली. उत्तरार्धात आणखी एका लोणसह गुणसंख्या ५०च्या पुढे नेली. निकिता पडवळच्या अष्टपैलू खेळाला मंदिरा कोमकर व सलोनी गजमलच्या चढायांची आणि कोमल आवळेच्या पकडींची उत्तम साथ मिळाल्याने हा विजय शक्य झाला. सांगलीच्या सिद्धी चव्हाण व श्रद्धा माळी यांनी उत्तम प्रयत्न केले, पण संघाला विजय मिळवून देता आला नाही.

 

मुंबई शहर पश्र्चिमने गत उपविजेत्या रत्नागिरीला ३८-२६ असे पराभूत करत उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. पहिल्या सत्रात २ लोण देत मुंबईने २४-१२ अशी भक्कम आघाडी घेतली होती. मात्र, रत्नागिरीने उत्तरार्धात झुंजार खेळ करत एका लोणची परतफेड केली. तरीही पूजा यादव, सोनाली शिंगटे व श्रद्धा कदम यांच्या संयमी खेळाने मुंबईने विजय सुनिश्चित केला. रत्नागिरीच्या समरीन आणि तसलीम बुरोंडकर भगिनींनी कडवी झुंज दिली.

 

पुणे शहरने नाशिक शहरला ३८-२७ असे नमवत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. हर्षा शेट्टी आणि आम्रपाली गलांडे यांच्या जोरदार चढायांना सिद्धी मराठे व अपूर्वा मराठेच्या पकडींची भक्कम साथ मिळाल्याने पुण्याने विजय साकारला. नाशिकच्या पूजा कुमावत, पार्वती निकम व पूजा शिंदे यांनी उत्तरार्धात एक लोण देत सामन्यात रंगत आणली. मात्र, त्यांचा प्रयत्न संघाला विजय मिळवून देण्यासाठी अपुरा पडला.

 



पुरुषांच्या गटात पुणे ग्रामीण, मुंबई उपनगर पूर्व आणि कोल्हापूरचे वर्चस्व

 

पुणे ग्रामीणने औरंगाबादवर ४९-१७ असा एकतर्फी विजय मिळवत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. पहिल्या सत्रातच २८-८ अशी मोठी आघाडी घेतलेल्या पुण्याने नंतरही वर्चस्व कायम ठेवले. अजित चौहान, विकास जाधव व संभाजी वाबळे यांच्या आक्रमक खेळाने हा विजय सहज शक्य झाला. औरंगाबादच्या गणेश चव्हाण व आश्लेष चव्हाण यांनी चांगला खेळ केला पण संघाला विजय मिळवता आला नाही.

 

मुंबई उपनगर पूर्वने अत्यंत चुरशीच्या सामन्यात रत्नागिरीचा ३६-३२ असा पराभव केला. पहिल्या डावात १८-११ अशी आघाडी घेतलेल्या मुंबई उपनगरला रत्नागिरीने दुसऱ्या डावात कडवी झुंज दिली. आर्यवर्धन नवाले आणि आकाश रूडले यांच्या प्रभावी चढायांना हृतिक कांबळी व शिवांश गुप्ता यांच्या पकडींची भक्कम साथ मिळाल्याने मुंबई उपनगरला विजय मिळवता आला. रत्नागिरीच्या अभिषेक भोजने, अविष्कार पालकर व आदित्य शिंदे यांनी उत्तरार्धात जोरदार खेळ करत २ लोण चढवले, पण विजयासाठी तो अपुरा ठरला.

 

कोल्हापूरने पहिल्या सत्रात १३-१६ अशी ३ गुणांची पिछाडी असूनही ठाणे ग्रामीणचा ४४-२९ असा पराभव करत विजय साकारला. उत्तरार्धात साहिल पाटील आणि सौरभ फागरे यांच्या तुफानी चढायांना दादासो पुजारेच्या पकडींची भक्कम साथ मिळाल्याने कोल्हापूरने हा रोमांचक विजय मिळवला. ठाणे ग्रामीणच्या सुरज तारे व अतुल देसले यांनी पहिल्या सत्रात चमकदार खेळ केला, मात्र उत्तरार्धात त्यांचा खेळ सावरला नाही.


Post a Comment

0 Comments