सिबिईयु शालेय कॅरम स्पर्धेत तनया दळवी अजिंक्य!
मुंबई : राष्ट्रीय स्तरावर चमकदार कामगिरी करणाऱ्या महात्मा
गांधी विद्यालयाच्या तनया दळवीने आपल्या अचूक खेळाने आणि उत्तम स्ट्रायकर
कौशल्याने सिबिईयु शालेय कॅरम स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. अंतिम सामन्यात
तनयाने पोद्दार अकॅडमी-मालाडच्या उदयोन्मुख कॅरमपटू प्रसन्न गोळेचा
८-५ असा पराभव करत अजिंक्यपदावर शिक्कामोर्तब केले.
तनयाची अचूकता, प्रसन्नचा प्रतिकार व्यर्थ
तनया दळवीने संपूर्ण सामन्यात उत्कृष्ट नियंत्रण राखत
खेळावर पकड घेतली. प्रारंभी काही गुण मिळवून आघाडी घेतलेल्या प्रसन्न
गोळेला तनयाच्या खेळासमोर झुकावे लागले, आणि अखेर
उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.
स्पर्धेचा भव्य समारोप
आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीच्या वतीने सिबिईयु
आणि न्यू इंडिया अॅशुरन्स कंपनी लिमिटेडच्या सहकार्याने आयोजित या
स्पर्धेचा भव्य समारोप को-ऑपरेटीव्ह बँक एम्प्लॉईज युनियनच्या ६५ व्या वर्धापन
दिनानिमित्त झाला. यावेळी विजेत्यांना सन्मानचिन्ह व विशेष
स्ट्रायकर देऊन गौरवण्यात आले.
पुरस्कार वितरण सोहळ्याला को-ऑप.
बँक एम्प्लॉईज युनियनचे खजिनदार प्रमोद पार्टे, कॅरमप्रेमी
अविनाश नलावडे, शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण आदी मान्यवर
उपस्थित होते.
उपांत्य फेरीतील रोमांचक सामने
उपांत्य फेरीत तनया दळवीने शारदाश्रम
विद्यामंदिरच्या सोहम जाधवचा १९-९ असा धक्कादायक पराभव केला, तर प्रसन्न गोळेने पाटकर
विद्यालय-डोंबिवलीच्या प्रसाद मानेला ९-८ अशा निसटत्या फरकाने पराभूत केले.
शालेय कॅरमपटूंसाठी सुवर्णसंधी!
मुंबई, ठाणे, पालघर, रायगड आणि जैतापूर येथील एकूण ४४
शालेय सबज्युनियर कॅरमपटूंनी या स्पर्धेत भाग घेतला होता. कॅरमपटूंना
प्रोत्साहन देण्यासाठी कामगार दिनी मोफत शालेय सुपर लीग कॅरम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून, या
स्पर्धेच्या पहिल्या चार विजेत्यांना थेट प्रवेश दिला जाणार आहे.
Post a Comment
0 Comments