Type Here to Get Search Results !

खेलो इंडिया पॅरा गेम्स 2025 महाराष्ट्राच्या महिलाशक्तीचा सुवर्ण पराक्रम!

 


खेलो इंडिया पॅरा गेम्स 2025  

महाराष्ट्राच्या महिलाशक्तीचा सुवर्ण पराक्रम!


नवी दिल्ली: महाराष्ट्राच्या महिलाखेळाडूंनी खेलो इंडिया पॅरा गेम्समध्ये पुन्हा एकदा आपली दमदार छाप सोडली आहे. अ‍ॅथलेटिक्स आणि पॉवरलिफ्टिंगमध्ये आपल्या जबरदस्त कामगिरीने राज्याचा गौरव वाढवणाऱ्या अकुताई उनभगत, भाग्यश्री जाधव आणि प्रतिमा भोंडे यांनी सलग दुसऱ्यांदा पदक पटकावत ऐतिहासिक यश संपादन केले.


अकुताई उनभगत – सुवर्णाची हॅट्ट्रिक!

38 वर्षीय अकुताई उनभगत हिने अ‍ॅथलेटिक्समधील गोळाफेक (F40 प्रकार) स्पर्धेत सुवर्णपदक जिंकत स्वतःचा दबदबा कायम ठेवला. तिने 5.79 मीटर अंतरावर गोळा फेकत विजय संपादन केला. याच प्रकारात महाराष्ट्राच्या रूही शिंगाडे हिने 4.43 मीटर फेकी करत कांस्यपदक मिळवले. अकुताईचे हे स्पर्धेतील दुसरे सुवर्ण ठरले, कारण याआधी तिने थाळीफेकमध्ये 15.83 मीटरच्या भक्कम कामगिरीसह सुवर्णपदक पटकावले होते.


मूळ पंढरपूरजवळील शेवते गावची रहिवासी असलेली अकुताई सध्या पुण्यात पॅरालिम्पिक खेळाडू सचिन खिलारी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेत आहे. सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील असलेल्या अकुताईने आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करण्याचा संकल्प केला आहे.


भाग्यश्री जाधव – सुवर्णपदकांचा सिलसिला कायम!

पॅरालिम्पिक खेळाडू भाग्यश्री जाधव हिनेही गतवर्षीच्या यशाची पुनरावृत्ती करत सलग दुसऱ्यांदा दोन सुवर्णपदके पटकावली. भालाफेक आणि गोळाफेक या दोन्ही प्रकारांमध्ये तिचे वर्चस्व राहिले. गोळाफेकीत तिने 7.30 मीटर अंतरावर गोळा फेकत सुवर्ण जिंकले.


नांदेड जिल्ह्यातील घोडवडज गावाची भाग्यश्री अवघ्या 18व्या वर्षी एका गंभीर आजारामुळे कोमात गेली होती, ज्यामुळे तिच्या पायाखालील शरीर अधू झाले. मात्र, कठोर मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर तिने पॅरा अ‍ॅथलेटिक्समध्ये स्वतःचे स्थान निर्माण केले आहे. सध्या ती पुण्यात पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर प्रशिक्षक रविंदर यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत आहे.



प्रतिमा भोंडे – पॉवरलिफ्टिंगमध्ये सुवर्णाची चमक!

पॉवरलिफ्टिंगच्या 50 किलो वजनी गटात नागपूरच्या प्रतिमा भोंडे हिने दमदार कामगिरी करत सुवर्णपदक जिंकले. 33 वर्षीय प्रतिमाने 86 किलो वजन उचलून महाराष्ट्राची शान उंचावली. तामिळनाडूच्या गोमाथीने 65 किलो वजन उचलून रौप्यपदक मिळवले, पण प्रतिमाने तब्बल 11 किलोने अधिक वजन उचलत आपली सरशी साधली.


गत स्पर्धेत रौप्यपदकावर समाधान मानावे लागलेल्या प्रतिमाने यावेळी सुवर्णपदक पटकावत आपले स्वप्न पूर्ण केले. द्रोणाचार्य पुरस्कारप्राप्त प्रशिक्षक विजय मुनेश्वर यांच्या मार्गदर्शनाखाली ती गेल्या वर्षभरापासून मेहनत घेत आहे. बालपणापासूनच पायाने दिव्यांग असलेल्या प्रतिमाच्या आईचे कॅन्सरमुळे निधन झाले. आपल्या दिवंगत आईचे देशासाठी पदक जिंकण्याचे स्वप्न पूर्ण करत असल्याचा अभिमान तिने व्यक्त केला.



भाग्यश्रीचा सुवर्ण षटकार!

दिल्लीतील जवाहरलाल नेहरू स्टेडियम हे भाग्यश्री जाधवसाठी भाग्याचे ठरले आहे. या स्टेडियममध्येच तिने सलग दोन खेलो इंडिया पॅरा गेम्समध्ये प्रत्येकी दोन सुवर्णपदके जिंकली आहेत. तसेच, याच मैदानावर झालेल्या पॅरा ग्रां-प्रितही दोन सुवर्णपदके मिळवत तिने सुवर्णाचा ‘षटकार’ लगावला आहे!


महाराष्ट्राचा अभिमान!

महाराष्ट्राच्या या तीन सुवर्ण कन्यांनी संपूर्ण राज्याचा गौरव उंचावला आहे. त्यांच्या कष्ट, जिद्द आणि मेहनतीमुळे त्यांनी आपल्या कुटुंबीयांचेच नव्हे, तर संपूर्ण देशाचे नाव उज्ज्वल केले आहे. आता त्यांचे लक्ष आंतरराष्ट्रीय स्पर्धांवर असून भविष्यातही अशीच चमकदार कामगिरी करण्याचा त्यांचा निर्धार आहे.

Post a Comment

0 Comments