Type Here to Get Search Results !

'मुंबई स्पोर्ट्स २ रे 'स्पोर्ट्सपर्सन ऑफ द इयर' आणि 'मुंबई स्पोर्ट्स ऑर्डर ऑफ मेरिट पुरस्कार जाहीर

 



मुंबई स्पोर्ट्सचे पुरस्कार जाहीर

'मुंबई स्पोर्ट्स २ रे 'स्पोर्ट्सपर्सन ऑफ द इयर'  आणि 'मुंबई स्पोर्ट्स ऑर्डर ऑफ मेरिट पुरस्कार जाहीर

ध्रुव सितवाला (बिलियर्ड्स व स्नूकर) व ऐश्वर्या मिश्रा (अॅथलेटिक्स) स्पोर्ट्सपर्सन ऑफ द इयरचे मानकरी 

 

रुजुता खाडे (जलतरण), सोनाली बोराडे (ऍक्रोबॅटीक जिम्नॅस्टिक्स) , अक्षन करुणाकर शेट्टी (बॅडमिंटन) व कुणाल कोठेकर (ऍक्रोबॅटीक  जिम्नॅस्टिक) हे “मुंबई स्पोर्ट्स ऑर्डर ऑफ मेरिट” पुरस्काराचे मानकरी तर विशेष श्रेणी पुरस्कार नताशा जोशी (शूटिंग) यांना जाहीर

 

या वर्षी ध्रुव सितवाला (बिलियर्ड्स व स्नूकर) व ऐश्वर्या मिश्रा (अॅथलेटिक्स) स्पोर्ट्सपर्सन ऑफ द इयरचे मानकरी ठरले आहेत त्यांना रु. एक लाख व संमानचिन्ह देऊन गौरवण्यात येणार आहे. रुजुता खाडे (जलतरण), सोनाली बोराडे (ऍक्रोबॅटीक जिम्नॅस्टिक्स) , अक्षय करुणाकर शेट्टी (बॅडमिंटन) व कुणाल कोठेकर (ऍक्रोबॅटीक  जिम्नॅस्टिक) हे मुंबई स्पोर्ट्स ऑर्डर ऑफ मेरिट” पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत. तर विशेष श्रेणी पुरस्कार नताशा जोशी (शूटिंग) यांना जाहीर झाला आहे. हे पुरस्कार मुंबई क्रिकेट असो. चे अध्यक्ष अजिंक्य नाईक यांच्या हस्ते प्रदान करण्यात येतील.  सदर पुरस्कार बंटस् संघ  सभागृह, कुर्ला येथे २८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी वितरीत केले जातील. यावेळी स्पोर्ट्स कोड तारक कि मारक यावर सुध्दा चर्चा होणार आहे. त्याचबरोबर या कार्यक्रमाल विविध खेळातील दिग्गज मंडळी उपस्थित राहणार आहेत. पुरस्कार जाहीर झालेल्या खेळाडूंची माहिती पुढील प्रमाणे.

 


ध्रुव सितवाला (बिलियर्ड्स व स्नूकर) – 'मुंबई स्पोर्ट्स स्पोर्ट्सपर्सन ऑफ द ईयर अवॉर्ड २०२४'

ध्रुव सितवाला (बिलियर्ड्स व स्नूकर) : ध्रुव सितवाला याने ३७ आंतरराष्ट्रीय बिलियर्ड्स आणि स्नूकर स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्याने २०२४ साली न्यूझीलंड ओपन आणि ऑकलंड ओपन बिलियर्ड्स चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदके जिंकली. आशियाई बिलियर्ड्स चॅम्पियनशिप २०२४ (सौदी अरेबिया) मध्येही त्याने सुवर्णपदक पटकावले. तसेचवर्ल्ड मॅचप्ले बिलियर्ड्स (आयर्लंड) आणि ऑस्ट्रियन ओपन बिलियर्ड्स चॅम्पियनशिपमध्ये रौप्य व कांस्यपदके मिळवली आहेत. त्याच्या करिअरमधील इतर प्रमुख यशांमध्ये २०२३च्या जागतिक बिलियर्ड्स चॅम्पियनशिपमध्ये दोन कांस्यपदकेतसेच पॅसिफिक आंतरराष्ट्रीय बिलियर्ड्स (२०२३) व पॅन-अम चॅम्पियनशिप (२०१९) यामध्ये रौप्यपदके जिंकण्याचा समावेश आहे. त्याच्या अचूक कौशल्यामुळे तो भारतीय क्रीडा क्षेत्रातील आदर्श खेळाडू ठरला आहे. आपल्या सातत्यपूर्ण कामगिरीमुळे ध्रुवने बिलियर्ड्स आणि स्नूकरमध्ये देशाचे नाव जागतिक पातळीवर उज्ज्वल केले आहे.

 


ऐश्वर्या मिश्रा (अॅथलेटिक्स) 'मुंबई स्पोर्ट्स स्पोर्ट्सवूमन ऑफ द ईयर अवॉर्ड २०२४' – 

४०० मीटर स्पर्धांमध्ये राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील कामगिरीसाठी सन्मान, भारतीय अॅथलेटिक्स मध्ये चमकणारे नाव भारतीय धावपटू ऐश्वर्या कैलाश मिश्रा यांनी आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय स्तरावर आपली ओळख निर्माण केली आहे. २०२३ च्या आशियाई चॅम्पियनशिपमध्ये त्यांनी ४०० मीटर व्यक्तिगत स्पर्धेत रौप्यमिश्र रिलेमध्ये सुवर्णतर महिला रिलेमध्ये रौप्य पदके जिंकली. तसेचआशियाई क्रीडा स्पर्धेतही ४०० मीटर महिला रिलेमध्ये रौप्यपदक मिळवले.

 

राष्ट्रीय स्तरावर२०२२ ते २०२४ दरम्यान त्यांनी ४०० मीटर स्पर्धेत अनेक राष्ट्रीय पदके मिळवली आहेत. सप्टेंबर २०२२ मधील राष्ट्रीय खेळांमध्ये त्यांनी ४०० मीटरमध्ये सुवर्णपदक पटकावले. ऐश्वर्या सध्या २०२४ मध्ये होणाऱ्या जागतिक रिले स्पर्धेसाठी भारतीय संघाची सदस्य म्हणून निवडली गेली आहे. त्यांच्या या कामगिरीमुळे त्या भारतीय अॅथलेटिक्सच्या उगवत्या ताऱ्यांपैकी एक ठरल्या आहेत.

 


रुजुता खाडे (जलतरण) - जलतरण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी गौरव - मुंबई स्पोर्ट्स ऑर्डर ऑफ मेरिट पुरस्कार

भारताची सर्वात वेगवान महिला जलतरणपटू रुजुता खाडेदक्षिण आशियातील आणि भारतातील सर्वात वेगवान महिला जलतरणपटू आहेत . त्या वीरधवल खाडे (ऑलिम्पिक जलतरणपटू आणि अर्जुन पुरस्कार प्राप्त) यांच्या पत्नी आहेत. महाराष्ट्र शासनाचा "शिव छत्रपती पुरस्कार" आणि CSCS प्रमाणपत्र (USA) यांसह ASCA स्तर जलतरण प्रशिक्षक अशी रुजुता यांची विशेष ओळख आहे.

 

आंतरराष्ट्रीय यश : 2019 सालच्या SAF गेम्समध्ये (काठमांडू) 50 मीटर फ्रीस्टाइल मध्ये सुवर्णपदक आणि दक्षिण आशियाई विक्रम केला. त्याच वर्षी बंगळुरू येथे झालेल्या आशियाई वयोगट जलतरण स्पर्धेत त्यांनी रिले प्रकारात रौप्य आणि कांस्य पदके जिंकली.

 

राष्ट्रीय पातळीवरील विक्रम: 2023 च्या वरिष्ठ राष्ट्रीय स्पर्धांमध्ये (हैदराबाद) 50 मीटर फ्रीस्टाईलसह अनेक सुवर्णपदके पटकावत नवीन राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केला. गोव्यातील राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत 50 मीटर फ्रीस्टाईलमध्ये सुवर्णपदकासह नवा विक्रम केला. रुजुता खाडे जलतरण क्षेत्रातील आपल्या उल्लेखनीय कामगिरीने भारतीय क्रीडा क्षेत्रात मानाचा तुरा रोवला आहे.

 


सोनाली बोराडे (ऍक्रोबॅटीक जिम्नॅस्टिक्स) – उत्कृष्ट प्रदर्शनासाठी मुंबई स्पोर्ट्स ऑर्डर ऑफ मेरिट 

पुरस्काराने सन्मानित. अॅक्रोबॅटिक जिम्नॅस्टिक्समधील प्रतिभावान खेळाडू सोनाली बोराडे ही अॅक्रोबॅटिक जिम्नॅस्टिक्स क्षेत्रातील एक उदयोन्मुख भारतीय खेळाडू आहे. सोनालीने विविध स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले असून तिच्या मेहनतीमुळे ती अॅक्रोबॅटिक जिम्नॅस्टिक्समध्ये एक चमकदार तारा बनली आहे. तिच्या कामगिरीने युवा खेळाडूंना प्रेरणा दिली आहे. सध्या आयकर विभागात काम करतात. त्यांना डायरेक्ट स्पोर्ट्स रिक्रूटमेंटद्वारे ही नोकरी मिळाली आहे.

 

सोनाली भारतातील सर्वात तरुण महिला अक्रॉबॅटिक जिम्नॅस्टिक्स आंतरराष्ट्रीय जज आहेत. सोनाली आशियाई अक्रॉबॅटिक जिम्नॅस्टिक्स चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकणारी पहिली भारतीय जिम्नॅस्ट आहे. त्यांनी अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभाग घेतला आहे आणि अनेक सुवर्णपदके जिंकली आहेत. त्यापैकी २०२२ (कझाकीस्थान) व २०२३ (उझबेकीस्थान) येथे झालेल्या एशियन अक्रॉबॅटिक जिम्नॅस्टिक्स चॅम्पियनशिप व गोवा येथे झालेल्या नॅशनल गेम्स मध्ये सुध्दा सुवर्णपदक जिंकली आहेत. त्याबरोबर नॅशनल अक्रॉबॅटिक जिम्नॅस्टिक्स चॅम्पियनशिप मध्ये अनेक सुवर्णपदकांना गवसणी घातली आहे.   



अक्षन करुणाकर शेट्टी (बॅडमिंटन) - बॅडमिंटनमधील उल्लेखनीय कौशल्यासाठी मुंबई स्पोर्ट्स ऑर्डर ऑफ मेरिट पुरस्कार सन्मानित.

 

भारतीय बॅडमिंटनचा उदय होणारा तारा पुणे भारतीय बॅडमिंटनमध्ये एक नवे नाव उजळून आले आहे. अक्षय करुणाकर शेट्टीहा युवा आणि प्रतिभावान बॅडमिंटनपटू, 2023 मध्ये देशातील सर्वोत्तम खेळाडूंमध्ये गणला जात होता. सध्या तो पुरुष दुहेरीत सहाव्या स्थानावर आहे. उच्च शिक्षित असलेला अक्षय आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे नाव उंचावण्यासाठी प्रयत्नशील आहे. अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये पदके जिंकून अक्षयने आपली क्षमता सिद्ध केली आहे. 2024 मध्ये त्याने पोलंड आणि नायजेरियामध्ये झालेल्या स्पर्धांमध्ये रौप्य आणि कांस्य पदके मिळवली. 2023 मध्ये त्याने राष्ट्रीय स्पर्धांमध्येही उल्लेखनीय कामगिरी केली. 2022 मध्ये तो सीनियर रँकिंग स्पर्धा जिंकला होता. अक्षयची ही कामगिरी त्याच्या कठोर परिश्रम आणि समर्पणाचे प्रतीक आहे. भारतीय बॅडमिंटनला एक उज्ज्वल भविष्य आहे आणि अक्षयसारखे युवा खेळाडू या भविष्याचे प्रतीक आहेत.

 


कुणाल कोठेकर (ऍक्रोबॅटीक  जिम्नॅस्टिक) -  उत्कृष्ट प्रदर्शनासाठी मुंबई स्पोर्ट्स ऑर्डर ऑफ मेरिट 

पुरस्काराने सन्मानित. अॅक्रोबॅटिक जिम्नॅस्टिक्समधील होणारा तारा कुणाल कोठेकर हा अॅक्रोबॅटिक जिम्नॅस्टिक्स क्षेत्रातील एक उगवता भारतीय खेळाडू आहे. विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये त्याने आपली छाप पाडली आहे. कुणालने कठोर परिश्रम व सातत्यपूर्ण सरावाद्वारे आपल्या क्रीडा कौशल्यात प्रगती केली आहे. त्याला भारताच्या जिम्नॅस्टिक्स क्षेत्रातील भविष्यातील महत्त्वाचा खेळाडू मानले जाते.

 

त्याने आंतरराष्ट्रीय पातळीवर 13व्या आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत (2023) सहभाग नोदवला होता. 2022 साली आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत कांस्यपदक, 2024 साली वरिष्ठ राष्ट्रीय स्पर्धेत 2 सुवर्ण आणि 2 रौप्यपदके. 37व्या राष्ट्रीय खेळांमध्ये सहभाग. 2023 मध्ये वरिष्ठ राज्य अजिंक्यपद स्पर्धेत 3 सुवर्णपदके. 2012 ते 2023 दरम्यान राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील अनेक सुवर्ण, रौप्य व कांस्यपदके.

 


विशेष श्रेणी पुरस्कार : नताशा जोशी (शूटिंग) - मूकबधिर ऑलिम्पिकमधील उल्लेखनीय यशासाठी सन्मान.

मूकबधिर ऑलिम्पिकमधील प्रेरणादायी नेमबाज नताशा जोशीने ब्राझीलमधील २४व्या मूकबधिर ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करत रायफल शूटिंग प्रकारात मिश्र गटात चौथा आणि वैयक्तिक स्पर्धेत सातवा क्रमांक मिळवला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते तिच्या यशासाठी सन्मानित करण्यात आले. २०२३ साली जर्मनीतील जागतिक मूकबधिर अजिंक्यपद स्पर्धेत नताशाने एक रौप्य व एक कांस्य पदक जिंकले. २०२४ साली इराणमध्ये होणाऱ्या आशिया पॅसिफिक मूकबधिर स्पर्धेसाठी तिची निवड झाली आहे. शालेय राष्ट्रीय सुवर्णपदक विजेती नताशा सातत्याने भारतीय नेमबाजी संघाच्या निवड चाचण्यांमध्ये आपले कौशल्य दाखवत आहे. तिची कामगिरी क्रीडाप्रेमींसाठी प्रेरणादायी आहे.

 

'मुंबई स्पोर्ट्स' ही नफा न कमावणारी संस्थां असून मुंबईतील पायाभूत क्रीडा सुविधा व क्रीडा संस्कृती सक्षम ठेवण्याच्या उद्‌द्देशाने स्थापन करण्यात आली आहे. २०१० साला पासून जय कवळी, महेंद्र चेंबूरकर, दिवंगत विनायक गायकवाड यांच्या पुढाकाराने बापू शरीफ, सुनील वालावलकर आणि दिवंगत वाली महमद यांच्या सहकार्याने 'मिळून सारे' या बॅनरखाली मुंबईतील क्रीडाजगत एकत्र येऊ लागले आणि २०२० साली 'मुंबई स्पोर्ट्स'ची स्थापना करण्यात आली. 'मुंबई  स्पोर्ट्स' संस्थेच्या कोअर कमिटीत अध्यक्ष आदिल सुमारीवाला, निमंत्रक जय कवळी, सदस्य जया शेट्टी, प्रदीप गंधे, उदय देशपांडे, सुदर्शन नायर, संजय शेटे, भास्कर सावंत, अरविंद प्रभू, नामदेव शिरगावकर यांचा समावेश आहे. मुंबईतील सर्व क्रीडा प्रकाराचे क्रीडापटू, क्रीडाप्रेमी, क्रीडा संस्थों, संघटना आणि कीड़ा क्षेत्राशी संबंधित सर्वांचे एकत्र येऊन मुंबईतील क्रीडा जगताच्या भल्यासाठी झटणाऱ्या क्रीडापटूंचे मुंबई स्पोर्ट्स हे एक मुक्त व्यासपीठ होय ! यातूनच गेल्या वर्षापासून 'स्पोर्ट्सपर्सन ऑफ द इयर'  आणि 'मुंबई स्पोर्ट्स ऑर्डर ऑफ मेरिट पुरस्कार देण्यास सुरवात केली आहे. 


Post a Comment

0 Comments