Type Here to Get Search Results !

स्टार टेनिसपटू सुमित नागलचा खार जिमखान्यातर्फे गौरव

 


स्टार टेनिसपटू सुमित नागलचा खार जिमखान्यातर्फे गौरव


मुंबई, २१ एप्रिल :  भारताचा अव्वल क्रमांकाचा टेनिसपटू सुमित नागल याने नुकतेच जागतिक टेनिस क्रमवारीत ८०व्या स्थानावर धडक मारली आणि त्याच्या या उत्कृष्ट कामगिरीची दाखल घेत खार जिमखान्याच्या वतीने त्याचा विशेष गौरव करण्यात आला. खार जिमखान्याचे  अध्यक्ष विवेक देवनानी (उर्फ पॉली), सरचिटणीस साहिब सिंग लांबा, खजिनदार विपुल वर्मा यांच्या हस्ते सुमित याला सन्मान चिन्ह देऊन त्याचा गौरव करण्यात आला. यावेळी खार जिमखान्याचे सदस्य आणि जिमखान्याच्या  युवा आणि अनुभवी टेनिस पटूंनी गर्दी केली होती. गेल्याच वर्षी सुमित नागल याची टेनिस विश्वातील अप्रतिम कामगिरी पाहून त्याला खार जिमखान्याचे मानद सदस्यत्व बहाल करण्यात आले होते.  यावेळी बोलताना सुमितने खार जिमखान्याच्या टेनिस कोर्टवर भारताचा स्टार टेनिसपटू महेश भूपती यांच्यासह केलेल्या सरावाच्या आठवणींना उजाळा दिला. जागतिक टेनिस क्रमवारीत आपण ८० व्या स्थानावर जाणे हा आपल्या कारकिर्दीतील एक टप्पा असून यावर्षीच  अधिक मेहनत करून किमान पहिल्या ५० क्रमांकात स्थान मिळविणे  हे आपले लक्ष्य असल्याचे त्याने सांगितले. २६ वर्षीय सुमित सध्या १ ते १४ जुलै दम्यान होणाऱ्या विम्बल्डन स्पर्धेवर लक्ष्य केंद्रित करीत असून या स्पर्धेसाठी तो जोरदार सराव करीत आहे.


२०२४ हे वर्ष सुमित नागल साठी खरोखरच संस्मरणीय ठरले. मोंन्टे कार्लो मास्टर्स टेनिस स्पर्धेत त्याने जागतिक क्रमवारीत ३८व्या स्थानी असणाऱ्या इटलीच्या माटीओ अमालडी याच्यावर सनसनाटी विजय मिळविला होता, मात्र त्यानंतर त्याला २०व्या मानांकित एच. रुने  विरुद्ध चुरशीच्या लढतीत पराभव पत्करावा लागला होता. फ्रेंच ओपन स्पर्धे साठी देखील तो पात्र ठरला होता. खरं तर २०१५ च्या विम्बल्डन  टेनिस स्पर्धेतील मुलांच्या दुहेरीत त्याने आपला सहकारी ली होआंग नाम याच्या साथीने विजेतेपदाला गवसणी घातली आणि  तेथूनच त्याच्या कारकिर्दीला कलाटणी मिळाली. आता तो भारताच्या डेव्हिस चषक टेनिस संघाचा नियमित सदस्य आहे. आपल्या कारकिर्दीत त्याने बरेच चढउतार अनुभवले आहेत. बऱ्याच वेळा त्याला दुखापतींचा सामना देखील करावा लागला. मात्र त्या प्रत्येक अनुभवातून शिकत तो प्रत्येक वेळी अधिक जोमाने खेळून पुढे जात आहे.


                                                              

फोटो ओळी -  भारताचा अव्वल क्रमांकाचा टेनिसपटू सुमित नागल याला सन्मानचिन्ह देऊन गौरविताना खार जिमखान्याचे अध्यक्ष विवेक देवनानी (उर्फ पॉली), सोबत खार जिमखान्याचे सरचिटणीस साहिब सिंग लांबा, खजिनदार विपुल वर्मा आदी दिसत आहेत.

Post a Comment

0 Comments